Ticker

6/recent/ticker-posts

शाळेत शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्याच्या वर्णनलेखनातील नाव व आडनावात बदल करण्यासाठी अर्ज

शाळेत शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्याच्या वर्णनलेखनातील नाव व आडनावात बदल करण्यासाठी अर्ज

"जसे मुख्याध्यापक तशी शाळाअसे मुख्याध्यापकांच्या भूमिकेचे वर्णन करण्यात येते. अध्यापकप्रशासक व व्यवस्थापक अशा प्रकारे मुख्याध्यापकांना विविध भूमिकेतून शाळेचे कामकाज करावे लागते. दर्जेदार अध्यापन करण्याबाबत सहकारी शिक्षकांना मार्गदर्शन करणारे अध्यापनकुशल मुख्याध्यापक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीस मदत करतात. शाळेतील कामकाजावर नियंत्रण ठेवून सहकारी शिक्षकांच्या अध्यापनातील त्रुटी ते कुशलतेने दूर करीत असतात. शालेय शिस्त राखणे आणि शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी विविध उपक्रमांची कार्यवाही करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यांच्या दैनंदिन कामकाजातून व वर्तनातून शाळेचा दर्जा प्रतिबिंबीत होत असतो. शिक्षकपालक व विदयार्थी यांच्याविषयी मुख्याध्यापकांना तपशीलवार माहिती असणे आवश्यक असते. तो समाजाभिमुख असणे आवश्यक असते. समाजऋणाची जाण ठेतून विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी झटणारे ज्ञानपरायण मुख्याध्यापक शाळेचा दर्जा वाढविण्यात यशस्वी होतात. त्यासाठी सर्व शैक्षणिक योजनांची व उपक्रमांची तपशीलवार माहिती करून घेऊन शिक्षक व समाजाच्या मदतीने त्या योजनांची व उपक्रमांची प्रभावी कार्यवाही करण्याची महत्त्वाची भूमिका मुख्याध्यापकांना पार पाडावयाची आहे. त्याचबरोबर शाळेचे बाह्यांग व शालेय रेकॉर्ड नीटनेटके ठेवण्याची त्याची जबाबदारी आहे. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचा सचिव म्हणून त्यांना महत्त्वाची भूमिका पार पाडावयाची आहे. 

शाळेत शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्याच्या नावआडनावजात/पोटजात व जन्मतारीख यात बदल करण्याबाबतचे नियम व पद्धती

शाळेच्या अभिलेखातील विद्यार्थ्याचे नावआडनावजातपोटजातजन्मतारीख इत्यादींसारख्या नोंदीत दुरुस्त्या करण्याबाबत विभागाकडे आलेल्या अर्जावर कार्यवाही करण्याच्या पद्धतीत एकरूपता असावी म्हणून खालील सूचना देत आहेत

(१) सर्वसाधारण नोंदवहीत एकदा केलेल्या नोंदीत यथास्थिती शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई किंवा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांची लेखी पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय बदल करता येणार नाही. ज्या ठिकाणी अशी पूर्वमान्यता घेतली असेल त्या ठिकाणी शाळाप्रमुख त्यांच्या सहीनिशी तांबड्या शाईने मान्यता दिलेला बदल नोंदवहीतील व शेऱ्याच्या स्तंभात किंवा योग्य ठिकाणी बदल करण्यास परवानगी दिलेल्या प्राधिकाऱ्यांच्या पत्राचा क्रमांक व दिनांक नमूद करतील.

(२) सर्वसाधारण नोंदवहीतील किंवा यथास्थिती शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रातील नोंदीत बदल करण्याबाबतचा अर्ज या कारणाकरिता विहित केलेल्या नमुन्यात विदयार्थी जर अज्ञान असेल तर त्यांच्या/तिच्या आई-वडिलांनी / पालकांनी किंवा विदयार्थी जर सज्ञान असेल तर त्याने/तिने स्वतः ज्या शाळेत विद्यार्थी शिकत असेल त्या शाळेच्या प्रमुखामार्फत शाळा ज्यांच्या अधिकारितेत येत असेल त्या शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई किंवा यथास्थिती संबंधित जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठविला पाहिजे.

(३) या नियमात तरतूद केलेल्या मर्यादेशिवाय इतर कोणत्याही बाबतीत विदयार्थी शाळा सोडून गेल्यानंतर शाळेच्या अभिलेखात नोंदविलेल्या जन्मतारखेत बदल करण्यास परवानगी दिली जाणार नाही. ज्या ठिकाणी सर्वसाधारण नोंदवहीतून शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात नक्कल करताना चूक झालेली असेल त्या ठिकाणी शाळाप्रमुख इच्छित बदल प्रमाणपत्रात न करता प्रमाणपत्राच्या मागील बाजूस नोंदवील आणि नोंदीवर सही करून दिनांक टाकील. तसेच त्याचा शिक्का (रबर स्टॅम्प) उमटवील. शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर संबंधित शाळाप्रमुखाने पृष्ठांकित केलेल्या नोंदीनुसार माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्रात झालेली वर्णलेखनातील चूक किंवा खरीखुरी चूक दुरुस्त करण्याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ स्वतंत्रपणे विचार करील.

टीप परिशिष्ट अठरामधील तरतुदीनुसार सर्वसाधारण नोंदवहीतील नोंदी त्या - केल्यानंतर आई-वडिलांनी / पालकांनी साक्षांकित कराव्या लागतात. या नोंदीची जाणीव आई-वडिलांना/पालकांना करून दिल्यानंतर त्यांचे साक्षांकन घेतले असल्याची शाळाप्रमुखाने खात्री करून घेतली पाहिजे. शाळाप्रमुखाने प्रत्येक विद्यार्थ्याची जन्मतारीख त्याच्या प्रगतीपुस्तकात किंवा दिनदर्शिकेत केली पाहिजे

व तिच्यावर विद्यार्थ्यांच्या आईवडिलांची / पालकांची सही घेतली पाहिजे.

(४) अनुज्ञेय बदल किंवा दुरुस्ती करण्याकरिता शाळेत शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्याकडून किंवा ज्याने शाळा सोडली आहे अशा विदयार्थ्याकडून आलेल्या अर्जाबरोबर कोणतीही फी आकारली जाणार नाही.

(५) अर्ज पुढे पाठविताना शाळाप्रमुखाने अर्जावरील सही पालकाने/आईवडिलांनी किंवा विद्यार्थी जर सज्ञान असेल तर त्याने स्वतः केलेली असल्याची व अशा अधिकृत व्यक्तीनेच अर्ज केला असल्याची पडताळणी केली पाहिजे.

जन्मतारखेतील बदल

(६) ह्या नियमासोबत जोडलेल्या नमुना क्रमांक १ मध्ये अर्ज सादर केला पाहिजे. त्यामध्ये

चुकीची नोंद कशी झाली याबाबतीत स्पष्टपणे स्पष्टीकरण करण्यात यावे.

(७) सुचविलेल्या बदलाच्या पुष्ट्यर्थ खालील कागदोपत्री पुरावा सादर केला पाहिजे.

(एक) जन्मनोंदवहीतील प्रमाणित उतार.

(दोन) लस टोचणी प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत.

(तीन) ख्रिश्चनांच्या बाबतीत बाप्तिस्मा प्रमाणपत्राची प्रमाणित प्रतआणि

(चार) विद्यार्थ्यांच्या खऱ्या जन्मतारखेबाबत वृत्तिधारी दंडाधिकाऱ्यासमोर विदयार्थ्याच्या आईवडिलांनी किंवा पालकाने केलेले शपथपत्रआणि

(पाच) असल्यासअन्य कोणताही कागदोपत्री पुरावा

(2) दाखल केलेला कागदोपत्री पुरावा त्या मुलाची व आईवडिलांची स्पष्टपणे ओळख पटवणारा असल्याशिवाय आणि खरोखरीच चूक झाली आहे याबाबत कोणतीही शंका राहिली नाही अशा स्वरूपाचा असल्याशिवाय जन्मतारखेत कोणताही बदल करण्यास मंजुरी देऊ नये. बदल मंजूर करणाऱ्या प्राधिकाऱ्यांनी तो मंजूर करण्याची कारणे लेखी नमूद करून ठेवली पाहिजेत.

नाव व आडनावातील बदल

(९) नावातील बदलांकरिता अर्जासोबत पुढील कागदोपत्री पुरावा सादर केला पाहिजे आणि पुढील पुराव्याची काळजीपूर्वक तपासणी केल्याशिवाय आणि त्याबाबत खात्री करून घेतल्याशिवाय कोणताही बदल करण्यास परवानगी दिली जाऊ नये.

(अ) दत्तविधानामुळे बदल झाला असेल तर त्याबाबतीत दत्तकपत्राची मूळ प्रत किंवा त्या दत्तकपत्राची प्रमाणित प्रत किंवा दत्तविधानामुळे नावामध्ये बदल झाला आहे हे दर्शविणारे वृत्तिधारी दंडाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र

(ब) विवाहामुळे बदल झाला असेल तर आईवडिलांचे किंवा पालकांचे व मुलींचे स्वतःचे दोन साक्षीदारांनी साक्षांकित केलेले प्रतिज्ञापत्र किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत.

(क) अन्य सर्व बाबतीत आईवडिलांनी किंवा पालकाने वृत्तिधारी दंडाधिकाऱ्यांपुढे केलेले शपथपत्र.

(१०) सार्वजनिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्याच्या बाबतीत नावातील बदल मंजूर झाला असल्यास त्याने/तिने आपल्या नावातील बदल महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात अधिसूचित करणे आवश्यक आहे. मात्र विवाहामुळे नावात झालेला बदल महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात अधिसूचित करणे आवश्यक नाही

(११) ह्या नियमासोबत जोडलेल्या नमुना अर्ज सादर केला पाहिजे.

वर्णनलेखनातील नाव व आडनावात बदल करण्यासाठी अर्ज

(१) अर्जदाराचे (पालकाचे) नाव--

व राहण्याचे ठिकाण--

 

(२) अर्जाची तारीख--

 

(३) ज्या विद्यार्थ्यांच्या नावात/आडनावात

बदल करावयाचा त्याचे नाव--

 

(४) शाळेचे नाव व ज्या इयत्तेत विदयार्थी

शिकत आहे/होता ती इयत्ता--

 

(५) विद्यार्थ्याचे पालकाशी असलेले नाते--

 

(६) जो बदल करण्यासाठी अर्ज केला आहे,

तो बदल केल्यानंतरचे नाव / आडनाव.--

 

(७) बदल करण्याची कारणे, उदा. दत्तविधान,

विवाह इत्यादी.--

 

(८) वरील बाब ७ मध्ये नमूद केलेल्या बाबी

व्यतिरिक्त अन्य बाबतीत चुकीची नोंद

कशी झाली ?-- 


(९) चुकीची नोंद झाली आहे हे अर्जदाराच्या

कसे लक्षात आले ?--


(१०) केलेल्या विनंतीच्या पुष्ट्यर्थ पुरावा--

 

(११) अर्जदाराची सही

 

टीप-

(एक) दत्तविधानाचे बाबतीत अर्जासोबत मूळ दत्तकपत्र किंवा त्या दत्तकपत्राची

प्रमाणित प्रत किंवा/दत्तविधानामुळे नाव बदलले आहे हे दर्शविणारे वृत्तिधारी

दंडाधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडावे.

(दोन) विवाहामुळे बदल झाला असेल त्या बाबतीत आईवडिलांचे किंवा पालकांचे

आणि मुलीचे स्वतःचे दोन साथीदारांनी साक्षांकित केलेले प्रतिज्ञापत्र किंवा विवाह

नोंदणी प्रमाणपत्राची प्रत जोडावी.

(तीन) इतर सर्व बाबतीत आईवडिलांनी किंवा पालकाने वृत्तिधारी दंडाधिकाऱ्यापुढे

केलेले शपथपत्र जोडावे.

 

(१२) ज्या शाळेत विद्यार्थी शिकत आहे/होता

त्या शाळेच्या प्रमुखाचा अभिप्राय व

शिफारशी

 

ठिकाण -

दिनांक -

 

प्रमुखाची सही

शिक्का (रबर स्टॅम्प)


Headmaster and school work मुख्याध्यापक व शालेय कामकाज 

इंग्रजीच्या अध्यापनात मुख्याध्यापकांची भूमिका 

शाळा व्यवस्थापन समिती बैठकीसाठी नमुना विषयपत्रिका

मुख्याध्यापक यांनी साहित्य खरेदी करताना करावयाची कार्यवाही

शाळेत शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्याच्या नाव, आडनाव, जात/पोटजात व जन्मतारीख यात बदल करण्याबाबतचे नियम व पद्धती

वर्णलेखनातील किंवा आकड्यातील दुरुस्तीसह जन्मतारखेत बदल करण्याकरिता अर्ज



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या