■ आर्थिक लेखाविषयक मार्गदर्शक
तत्त्वे School Financial Accounting Guidelines
"जसे मुख्याध्यापक तशी शाळा' असे मुख्याध्यापकांच्या भूमिकेचे वर्णन करण्यात येते. अध्यापक, प्रशासक व व्यवस्थापक अशा प्रकारे मुख्याध्यापकांना विविध भूमिकेतून
शाळेचे कामकाज करावे लागते. दर्जेदार अध्यापन करण्याबाबत सहकारी शिक्षकांना
मार्गदर्शन करणारे अध्यापनकुशल मुख्याध्यापक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीस मदत
करतात. शाळेतील कामकाजावर नियंत्रण ठेवून सहकारी शिक्षकांच्या अध्यापनातील त्रुटी
ते कुशलतेने दूर करीत असतात. शालेय शिस्त राखणे आणि शिक्षणाच्या
सार्वत्रिकीकरणासाठी विविध उपक्रमांची कार्यवाही करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.
त्यांच्या दैनंदिन कामकाजातून व वर्तनातून शाळेचा दर्जा प्रतिबिंबीत होत असतो.
शिक्षक, पालक व विदयार्थी यांच्याविषयी मुख्याध्यापकांना
तपशीलवार माहिती असणे आवश्यक असते. तो समाजाभिमुख असणे आवश्यक असते. समाजऋणाची जाण
ठेतून विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी झटणारे ज्ञानपरायण मुख्याध्यापक शाळेचा दर्जा
वाढविण्यात यशस्वी होतात. त्यासाठी सर्व शैक्षणिक योजनांची व उपक्रमांची तपशीलवार
माहिती करून घेऊन शिक्षक व समाजाच्या मदतीने त्या योजनांची व उपक्रमांची प्रभावी
कार्यवाही करण्याची महत्त्वाची भूमिका मुख्याध्यापकांना पार पाडावयाची आहे.
त्याचबरोबर शाळेचे बाह्यांग व शालेय रेकॉर्ड
नीटनेटके ठेवण्याची त्याची जबाबदारी आहे. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचा सचिव
म्हणून त्यांना महत्त्वाची भूमिका पार पाडावयाची आहे. शाळा स्तरावर साहित्य खरेदी
व त्याच्या नोंदीविषयी मुख्याध्यापकास खालील मार्गदर्शक तत्वे देण्यात आळेली आहेत.
आर्थिक लेखाविषयक मार्गदर्शक तत्त्वे School Financial
Accounting Guidelines
(१) शाळा स्तरावर विविध योजना अंतर्गत विविध
अनुदाने प्राप्त होतात. योजनानिहाय बँकखाते स्वतंत्र उघडण्यात यावे. त्यात संबंधित
योजनांतर्गत प्राप्त अनुदानाचे धनादेश (चेक) जमा करावेत.
(२) बँक खाते शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सचिव
तथा मुख्याध्यापक) यांचे नावे संयुक्त असावे.
(३) सर्व अनुदाने शाळेला परस्पर दिली जात नाहीत
तर ती शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती /प्रभाग/वॉर्ड शिक्षण समितीकडे दिली जातात.
त्यातून खर्च करण्याकरिता समितीची मान्यता आवश्यक असते.
(४) योजनानिहाय अनुदानाचा हिशोब वेगळा ठेवावा.
(५) काही वेळा खर्चास पूर्व मान्यता घेणे शाळेस
शक्य होणार नाही. अशा वेळेस नंतर होणाऱ्या सभेत सदर खर्चाची कार्योत्तर मान्यता
घ्यावी.
(६) अनुदान ज्या कारणाकरिता दिले आहे त्याच
कारणाकरिता योग्य वेळी वापरले जावे.
(७) विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून शालेय
साहित्य खरेदी करणे आवश्यक आहे. खर्च करताना शासनाच्या/जिल्हा परिषदेच्या खरेदी
नियमांचे पालन आवश्यक आहे.
(८) खर्चाची सर्व प्रमाणके प्रमाणक क्रमांकानुसार
नीट लावून ठेवावीत. वरिष्ठ कार्यालयास पाठविण्याची गरज नाही. ती प्रमाणके मात्र
योग्य त्या प्राधिकाऱ्यास तपासणीकरिता, लेखा परीक्षणाकरिता
उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील.
(९) मिळालेल्या अनुदानाचे उपयोगिता प्रमाणपत्र
विहित नमुन्यात गटशिक्षणाधिकाऱ्याकडे सादर करावे.
(१०) देण्यात येणारी अनुदाने शक्यतोवर त्याच
आर्थिक वर्षात खर्च झाली पाहिजेत. तथापि काही रक्कम शिल्लक राहिली तर ती
सर्वसाधारणतः एका वर्षात (१२ महिन्यात) खर्च झालीच पाहिजे.
(११) आर्थिक नोंदी ठेवताना
(अ) जिल्हा परिषद व पंचायत
समिती लेखा संहिता, १९६८
आणि (ब) महाराष्ट्र
आकस्मिक खर्च नियम, १९६५ या नियमांचा व परिशिष्टांचा वापर
करावा.
(१२) सर्व शिक्षा अभियानांतर्गत विविध
अनुदानांच्या खर्चाच्या नोंदी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई प्रकाशित (विविध अनुदानांचा विनियोग व त्यांचा हिशोब ठेवण्याची
पद्धती) या पुस्तिकेतील मार्गदर्शक तत्त्वांनुसार करावे.
■ वित्तीय अभिलेख नमुने
शाळास्तरावर प्राप्त होणाऱ्या विविध अनुदानांचा
विनियोग व हिशोब लेखनासाठी पुढीलप्रमाणे नोंदपत्रके, रजिस्टर्स
आवश्यक आहेत.
अ) रोजकीर्द (कॅशबुक) - रोजकीर्द म्हणजे दैनंदिन
आर्थिक व्यवहार ज्या क्रमाने घडतात, त्या क्रमाने
ज्या वहीत नोंदविले जातात ती नोंदवही. यामधील नोंदी योजनानिहाय स्वतंत्र ठेवायच्या
असतात. (१) रोजकीर्द ही पृष्ठांकित करून स्वतःच्या सहीने मुख्याध्यापकांनी
प्रमाणित केलेली असावी.
(२) रोजकिर्दीत रोजच्या रोज आर्थिक व्यवहाराच्या
नोंदी कराव्यात.
(३) ज्या दिवसात आर्थिक व्यवहार झाला नसेल त्या
कालावधीत 'आर्थिक व्यवहार नाही' अशी
नोंद करावी. उदा. ०२-०८-२००४ ते १२-०८-२००४ आर्थिक व्यवहार नाही.
(३) रोजकीर्दीमधली रोजच्या आर्थिक नोंदी पूर्ण
केल्यावर मुख्याध्यापकांनी सही करावी.
(४) शासकीय अनुदानाचे चेक जमा करताना चेक कोणाकडून
आला,
क्रमांक, तारीख व रक्कम यांचा स्पष्ट उल्लेख
असावा.
(५) चेक रजिस्टर ठेवावे.
ब) खतावणी (लेजर) –
खतावणी म्हणजे रोजकीर्द नोंदीचे वर्गीकरण करून
प्रत्येक व्यवहाराशी संबंधित असलेली खाती नोंदविण्यासाठी उपयोगात आणली जाणारी
स्वतंत्र वही.
(१) खतावणीमध्ये अनुदान प्राकर. निहाय स्वतंत्र
विभाग असावेत. त्यांना अनुदान प्रकारानुसार नावे / शीर्षके असावीत.
(२) रोजकीर्दमध्ये ज्या दिवशी आर्थिक व्यवहाराची
नोंद केली जाईल त्याच दिवशी खतावणीतील नोंदी पूर्ण कराव्यात.
(३) खतावणीत (लेजर) आवश्यकतेनुसार वेगवेगळी शीर्षके
असावीत.
क) पावत्या (व्हाऊचर्स)
(१) प्रत्येक खर्चाच्या बाबीच्या विहित नमुन्यातील
पावत्या त्यावर व्हाऊचर्स फाईलमध्ये संकलित कराव्यात. योग्य त्या नोंदी करून
ठेवाव्यात.
(२) व्हाऊचर्सवर मुख्याध्यापक, शाळेचे नाव व चालू आर्थिक वर्षातील दिनांक व क्रमांक असावा. लेखाशीर्षाची
देखील त्यावर नोंद असावी.
(३) रू. ५,०००/- च्या
रक्कमेवरील पावतीवर रेव्हेन्यू स्टॅम्प लावला आहे याची खात्री करावी.
(४) पावतीवर पुरवठादाराच्या नावाचा व पत्त्याचा
स्पष्ट उल्लेख असावा.
(५) पुरवठादाराच्या पावतीवर विक्रीकर नंबर आदी
नोंदविलेला असावा.
(६) पावतीवर वस्तूचा तपशील असावा/कोटेशन
(दरपत्रक) प्रमाणे वस्तू असल्यास कोटेशन व बिलावरील वर्णन व वस्तू तंतोतंत जुळलेली
असावी.
(७) क्रेडिट बील असल्यास पैसे दिल्यावर वेगळी
पावती घ्यावी.
(८) पावती खर्च टाकल्यावर तिच्यावर paid and
cancelled चा शिक्का मारावा व मुख्याध्यापकांनी सही करावी.
(९) पावतीप्रमाणे वस्तू मिळाल्यावर संबंधितांना
योग्य ती पोहोच दयावी.
(१०) योग्य त्या साठा रजिस्टरमध्ये त्या त्या
वस्तूंची नोंद करावी.
(११) संबंधित वस्तूच्या पावतीच्या मागे त्या त्या
वस्तूंची नोंद साठा रजिस्टरमध्ये केल्याचा दाखला लिहावा. त्यामध्ये वस्तूचा
अनुक्रमांक, दिनांक, वर्ष आणि
मुख्याध्यापकांची स्वाक्षरी असावी.
(१२) विकत घेतलेल्या प्रत्येक जड वस्तूवर साठा
रजिस्टरमधील संबंधित क्रमांक, शाळेचे नाव व आर्थिक वर्षाची
नोंद करावी.
(१३) या विषयाबाबत शंका निर्माण झाल्यास विस्तार
अधिकारी (शिक्षण) यांच्याशी चर्चा करावी व मार्गदर्शन घ्यावे.
आपणास हे ही आवडेल-
Headmaster and school work मुख्याध्यापक व शालेय कामकाज
इंग्रजीच्या अध्यापनात मुख्याध्यापकांची भूमिका
0 टिप्पण्या